सध्या आपल्याकडे अनेक जण पशुपालन हा व्यवसाय करताना दिसत आहेत. शेती सोबतच हा जोड व्यवसाय शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देत आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा पशुपालनाकडे वाढत चालला आहे. दरम्यान बारामती तालुक्यातील एक युवक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याचं कारण असं की, बारामती तालुक्यातील युवा दूध उत्पादक अविरत संभाजी पानसरे यांच्या गाईची बेंगलोरच्या केपीडीएफएम मध्ये दूध स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे या गाईला तब्बल ६ लाख ५१ हजार रुपयांची किंमत देऊन खरेदी करण्यात आले आहे. गायची ही किंमत राज्यात मिळालेली सर्वात उच्चांक किंमत असल्याचे म्हटले जात आहे. गाईला एवढी विक्रमी किंमत मिळाली असल्यामुळे तेथील परिसरातून पानसरे यांचे कौतुक केले जात आहे.
माहितीनुसार, युवा दूध उत्पादक पानसरे यांचा थोपटेवाडी या ठिकाणी ३२ गायींचा गोठा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गोट्यामध्ये ५४ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाईंचा समावेश आहे. त्यांच्या गोठ्यामधील एक गाय विक्रीसाठी होती यावेळी कर्नाटक प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मिंग असोसिएशनचे प्रमुख पृथ्वी गोवडा आणि रघु रविचंद्र यांनी पानसरे यांच्या फार्मला भेट दिली आणि त्या ठिकाणी येऊन गायची पाहणी केली. यावेळी त्यांनी जवळपास ६ लाख ५१ हजार रुपये विक्रमी किंमत देत गायीची खरेदी केली आहे.
पानसरे यांच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी डेरी डिप्लोमाचे शिक्षण घेतले असून मागच्या दहा वर्षापासून ते चांगल्या प्रकारे दूध व्यवसाय करत आहेत. सध्या त्यांचे जवळपास दिवसाला चारशे लिटर दूध निघत आहे. स्पर्धेसाठी खरेदी केलेली गाई नवीनच व्याली असून सध्या ती गाय जवळपास ५० लिटर दूध देत आहे मात्र ती गाई दहा दिवसात अजून वाढेल आणि ६० लिटरपर्यंत जाईल अशी अपेक्षा पानसरे यांनी व्यक्त केली आहे.